निगुडे येथून शेतविहिरीतील कृषीपंप चोरीला

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

बांदा : निगुडे येथील शेतविहिरीतून २५०००/- किमतीचा ३ हॉर्स पॉवर क्षमतेचा कृषीपंप चोरीला गेला असून याबाबतची तक्रार शुभलक्ष्मी गुरुनाथ सूर्यवंशी यांनी बांदा पोलिसात दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सौ. सूर्यवंशी सावंतवाडी सालईवाडा येथील घरी आपल्या पतीसोबत राहत असून त्यांच्या मालकीची निगुडे येथील गावात जमीन आहे. सदर जमिनीत त्यांच्या मालकीची विहीर असून या विहिरीत पाणीउपसा करण्यासाठी महाकृषी अभियान अंतर्गत सोलार सिस्टम सहित कृषीपंप बसवण्यात आला होता. या ठिकाणी बागेची देखभाल करण्यासाठी मडुरा येथील अशोक धुरी यांची कामगार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सकाळी ७ ते १२:३० या वेळेत ते आपले काम आटोपून घरी जात असत. दिनांक ८ मार्च रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे बागेला पंपाने पाणी देऊन आपल्या घरी गेले.

दिनांक ११ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास सौ. सूर्यवंशी यांचे पती गुरुनाथ सूर्यवंशी यांनी बागेला भेट दिली. यावेळी झाडांना पाणी लावण्याच्या हेतूने पंप सुरू केला असता बागेला पाणी आले नाही. यावेळी त्यांनी विहिरीमध्ये जाऊन पाहणी केली असता पंप दिसून आला नाही. याबाबत त्यांनी बागेचे काम पाहणाऱ्या अशोक धुरी यांच्याकडे विचारपूस केली असता ८ मार्च रोजी सकाळी ७ ते १२:३० या वेळेत सदर पंप विहिरीतच असल्याचे सांगितले. गुरुनाथ सूर्यवंशी यांनी घरी जाऊन ही गोष्ट आपल्या पत्नी सौ. सूर्यवंशी यांच्या कानावर घातली. यानंतर दिनांक १२ व १३ मार्च रोजी त्यांनी आजूबाजूच्या शेतात व विहिरीत पडला असेल म्हणून पंपाचा शोध घेतला असता त्या ठिकाणी तो आढळून आला नाही. यावेळी सदर पंप चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यांबाबत त्यांनी बांदा पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!