झुंजणाऱ्या गव्यांची वाहनांना धडक

चौघे जखमी; तुळस येथील घटना

वेंगुर्ले : तुळस मार्गे सावंतवाडी रस्त्यावर तुळस येथील शिवाजी हायस्कूलजवळ सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गवा रेड्यांच्या झुंजीमुळे थरारक अपघात घडला. दोन गव्यांमध्ये सुरू झालेल्या भीषण झुंजीदरम्यान एक गवा भरधाव वेगात धावत येत समोर उभ्या असलेल्या ओमनी व रिक्षेला जोरदार धडकला. यामुळे चारजण जखमी झाले, तर ओमनीचे मोठे नुकसान झाले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी तुळस परिसरात गव्यांच्या मोठ्या कळपाने अचानक रस्ता ओलांडला. याचवेळी दोन भलेमोठे गवे एकमेकांवर तुटून पडले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. ही झुंज पाहून वेंगुर्लेहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी ओमानी आणि तिच्या मागे असलेली रिक्षा चालकांनी प्रसंगावधान राखून तत्काळ थांबवली.दरम्यान, झुंजीत पराभूत झालेला एक आडदांड गवा जिवाच्या आकांताने पळत सुटला. अंधार, धुके आणि मागावर असलेला दुसरा गवा यामुळे बिथरलेला गवा ओमनीला जोराने धडकला. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ओमणीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर त्याची धडक पाठोपाठ असलेल्या रिक्षेलाही बसली.

या अपघातात ओमनीमधील सोनुर्ली-सावंतवाडी येथील लक्ष्मण रामा जाधव (३१) व रामा लक्ष्मण जाधव (६५) तसेच वेंगुर्ले येथील रिक्षाचालक गोविंद रामचंद्र जाधव आणि धनश्री गोविंद जाधव हे जखमी झाले. जखमींना तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

error: Content is protected !!