कोळंब येथील संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न

हल्लेखोर फरार; हल्ल्याच्या ठिकाणी आढळले बुटांचे ठसे

मालवण : तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे गोळीबाराची एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अज्ञाताने हा गोळीबार केला, मात्र सुदैवाने गोळी त्यांच्या डोक्याच्या अगदी जवळून गेल्याने शेलटकर यांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. ही घटना रविवारी रात्री ९.१५ च्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेलटकर आपल्या घरी असताना अचानक त्यांच्या दिशेने गोळी झाडण्यात आली. गोळीबाराचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच गोंधळ उडाला.

हल्लेखोराने झाडलेली गोळी शेलटकर यांच्या डोक्याला हुलकावणी देऊन घराच्या परिसरात जाऊन लागली. या गोळीबाराची तीव्रता घराची किचन रूम, अंगण आणि तिथे उभ्या असलेल्या दुचाकीवर विखुरलेल्या बंदुकीच्या छऱ्यांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपीने स्वप्नील शिर्सेकर यांच्या समोरील कंपाऊंडवरून उडी मारून पळ काढला आणि यावेळी पळून जाताना त्याने एका व्यक्तीला जोराचा धक्काही दिला. ज्या ठिकाणाहून गोळीबार करण्यात आला, तिथे पोलिसांना तपासादरम्यान आरोपीच्या बुटांचे ठसे आढळून आले आहेत. हा आपल्याला संपवण्याचाच स्पष्ट कट होता, सुदैवाने आपण यातून वाचलो अशी प्रतिक्रिया शेलटकर यांनी दिली. तसेच पोलिसांनी संशयितांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!