कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार!

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. दोन्ही बस स्थानकांत पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ऊन पावसात ताटकळत राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत होती.

जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी बस स्थानकात देखील जेमतेम २५ प्रवाश्यांची बैठक व्यवस्था होती. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याजवळ स्वतंत्र बैठकीची मागणी केली होती, त्या मागणीनुसार प्रताप सरनाईक यांनी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करून दोन्ही बस स्थानक परिसरात सुविधा निर्माण करण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे कुडाळ बस स्थानक परिसरासाठी ३ कोटी तर सिंधुदुर्गनगरी बस स्थानक परिसरासाठी २ कोटी अश्या एकूण ५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. लवकरच या दोन्ही बस स्थानकांच्या सुधारणेला सुरुवात होणार आहे.

error: Content is protected !!