उलटसुलट चर्चांना उधाण
कुडाळ : जिल्हा परिषद पावशी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच “मोठ मोठे गार केले… गंमत मधी… चल” अशा आशयाचा बॅनर झळकला होता. ज्यावर दया अणावकर यांचा फोटो होता. या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाहीफेक करण्यात आल्यामुळे पणदूर पंचक्रोशीमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
या निवडणुकीत दया अणावकर यांनी स्वतः पावशी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि मित्रमंडळासह उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार केला. विजयानंतर लावलेला हा बॅनर म्हणजे एका प्रकारे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यावर झालेल्या शाईफेकीमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. भरचौकातील बॅनरवर शाई फेकून विरोध दर्शवणारे हे अज्ञात कोण? आणि ही शाईफेक राजकीय सूडापोटी झाली की निव्वळ खोडसाळपणा? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे पावशी मतदारसंघातील राजकीय ईर्ष्या आता चव्हाट्यावर आली आहे. कुडाळच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


Subscribe









