कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार
सिंधुदुर्ग : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत रुपये 1.09 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी दिली असून त्यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले.
जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाणारे कुडाळ शहर हे रेल्वे स्थानक, व्यापारी बाजारपेठ व विविध नागरी सुविधांमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र बनले आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक व ग्रामीण भागातील नागरिकांची ये-जा होत असल्याने शहरातील घनकचऱ्याचे प्रमाण लक्षणीय वाढले होते. वाढत्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व दीर्घकालीन व्यवस्थापन करणे ही नगरपंचायतीसमोरची प्रमुख गरज होती.
या पार्श्वभूमीवर मा. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करून आमदार निलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरपंचायतीस आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत रुपये 1.09 कोटीचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रस्तावित प्रकल्पामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे
बायोगॅस प्रकल्प (Biogas Plant) – ओल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती
एमआरएफ शेड (Material Recovery Facility) – सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर
सॅनिटरी लँडफिल – उर्वरित कचऱ्याची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट
या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्याने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांना मोठी चालना मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी व जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे कुडाळ नगरपंचायतीतर्फे नगराध्यक्ष सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर ,यांनी विशेष आभार व्यक्त केले.
कुडाळ शहराला प्रथमच घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होत असून या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे “स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कुडाळ” या संकल्पनेच्या दिशेने एक ऐतिहासिक व निर्णायक पाऊल उचलले गेले आहे.
सदर कामी नगराध्यक्ष सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांनी प्रशासन व सर्व सहकारी न.प सदस्य यांचे देखील आभार मानले व अशाच सकारात्मक ऊर्जेने प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे सांगितले.


Subscribe









