पहाटेच उघडकीस आला धक्कादायक प्रकार
कुडाळ : माड्याचीवाडी-करमळगाळू येथे जेसीबी ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले दीपक विठ्ठल पालकर (वय ३८) यांनी आपल्या राहत्या घराच्या माडीवर लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे, कोणालाही आवाज जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या तोंडात फडका कोंबलेला होता.
विक्रम पालकर यांनी निवती पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते. पहाटे दीपक यांचा मधला भाऊ बाथरुमला जाण्यासाठी उठला असता घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे सर्वांना उठवून दीपक यांचा शोध सुरू करण्यात आला.
दीपक यांच्या मुलीने वडिलांच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलचा आवाज माडीवरून येत असल्याचे लक्षात आले. मुलगी आणि भाऊ माडीवर पोहोचले तेव्हा दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. माडीवरील खिडकीवर चढत त्यांनी लोखंडी बाराला दोरी टाकून गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
घटनास्थळी निवती पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, माजी सरपंच सचिन गावडे, रायगाव पोलीस पाटील शेखर परब, मडगाव पोलीस पाटील हरेश वारंग, गोंधयाळे पोलीस पाटील सौ. खुल्ली यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.
दीपक पालकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


Subscribe










