डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा गळा चिरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

वस्तरा आणि चॉपरच्या सहाय्याने चिरला गळा

कणकवली : डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित वर्धन के.जे. (वय २०) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कर्नाटकातील अणूर गावातून ताब्यात घेतले आहे. खूनानंतर तो फरार होता. काल (५ नोव्हेंबर) सायंकाळी आपल्या घरात जात असताना एलसीबीच्या पथकाने शिताफीने ही कारवाई केली.

बंगळूर येथील डॉ. रेड्डी यांचा त्यांच्या कारमध्येच खून करण्यात आला होता. खुनानंतर त्यांचा मृतदेह साळीस्ते येथे तर कार तिलारी परिसरातील एका पुलाजवळ फेकून देण्यात आली होती. या प्रकरणातील चौघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र गळा चिरणारा वर्धन फरार असल्याने त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक तैनात होते.

आज दुपारी वर्धनला कणकवलीत आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार संशयित अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अशा पद्धतीने केला खून

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रेड्डी हे कारमध्ये चालकाच्या शेजारी बसले होते. मागील सीटवर वर्धन आणि त्याचे दोन साथीदार होते. वर्धन याने वस्तरा आणि चॉपरच्या सहाय्याने डॉ. रेड्डी यांचा गळा चिरला तसेच छाती व पाठीवर वार केले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमा करून चेहरा विद्रूप केला होता.

या खून प्रकरणातील संशयितांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश राठोड, अमोल कांडर, विक्रम पवार आदी अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

error: Content is protected !!