डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणात पाचवा आरोपी जेरबंद

२० वर्षीय वर्धन के. एन. ला कर्नाटकातून अटक

कणकवली : बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी वर्धन के. एन. (वय २०, रा. अनुर, ता. चिंतामणी, जि. चिखबल्लापूर, कर्नाटक) याला एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई ५ नोव्हेंबर रोजी एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, अंमलदार अमर कांडर, चालक विक्रम पवार व मलकारसिद्द जमादार यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, व एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता आरोपी वर्धन के. एन. याला घेऊन एलसीबीचे पथक कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले व आरोपीला कणकवली पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

२३ ऑक्टोबर रोजी कणकवली तालुक्यातील साळीस्ते गणपती साना येथे अज्ञात पुरुषाचा धारदार शस्त्राने भोसकलेला मृतदेह आढळला होता. तपासानंतर तो मृतदेह बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान या खुनाच्या प्रकरणात एलसीबीने पकडलेल्या आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे, तर उर्वरित चार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. २५ ऑक्टोबरपासून मागील पंधरवडाभर एलसीबीचे पथक बेंगळुर येथे ठाण मांडून तपास करत होते. अत्यंत हायप्रोफाईल असलेल्या या मर्डर मिस्ट्रीचा मोठा धागा उकलण्यात एलसीबी सिंधुदुर्गला यश मिळाले असून उर्वरित आरोपींना लवकरच गजाआड केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!