कुडाळ : कोकण… परमेश्वराच्या जादुई कुंचल्यातून रेखाटला गेलेला अद्भुत कलाविष्कार. याच कोकणाचं बहुगुणी अंग म्हणजे आपलं कुडाळ शहर. शहराच्या एका बाजूस अवकाशाला स्पर्श करू पाहणारा देवाचा डोंगर तर डोंगराच्या पायथ्याशी संथपणे वाहणारी कुडाळवासियांची जीवनदायीनी भंगसाळ नदी. या सर्वांना चार चांद लावतं कुडाळचं ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिर…
छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या कुडाळ शहराला फार मोठा शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेलं आपलं कुडाळ शहर व्यापाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. जिल्ह्यात स्वतःची एक वेगळी ओळख असणारं आपलं कुडाळ शहर जुनी कात टाकून विकासाची नवी झालर परिधान करत आहे.
२०१६ साली कुडाळ शहरात नगरपंचायत स्थापन झाली. हा दिवस कुडाळच्या विकासाचा टर्निंग पॉईंट ठरला. २०१६ ते २०२४ या कालावधीत कुडाळच्या विकासरथाने चांगलाच वेग पकडला. अखेर तो दिवस उजाडलाच आणि या विकासरथाचं सारथ्य प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांच्याकडे आलं. रथाने चांगला वेग धरला होताच पण या वेगाला योग्य दिशा देण्याचं काम प्राजक्ता ताईंनी केलं. कुडाळ शहराचा कायापालट करण्याची जिद्द आणि आमदार निलेश राणे यांची मिळालेली खंबीर साथ यामुळे कुडाळ शहरात अनेक सकारात्मक बदल घडून आले.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील रस्ते, नळपाणी योजना, स्ट्रीटलाईट, सोलर हायमास्ट, इ – चार्जिंग स्टेशन, संरक्षक भिंत, स्मशानभूमीतील अनुषंगिक कामे इत्यादी ६८ विकासकामांसाठी तब्बल ७ कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला. यासाठी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. कुडाळ नगरपंचायत झाल्यापासून मागील ९ वर्षात पहिल्यांदाच एवढा भरघोस निधी मंजूर झाला. विशेष म्हणजे कुडाळ नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीत एवढा विक्रमी निधी मंजूर करून आणल्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. कोणत्याही स्त्रीने मनाशी ठरवल्यानंतर ती कोणतीही गोष्ट साध्य करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर.
ज्याप्रमाणे संत राऊळ महाराज चौक ते कुडाळ एमआयडीसीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांमुळे परिसर उजळून निघाला आहे अगदी त्याचप्रमाणे अभिमन्यू हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंतचा रस्ता देखील उजळून निघणार आहे. त्याचप्रमाणे एस. टी. स्टँडसमोरील I Love Kudal व माझं कुडाळ हे दोन्ही सेल्फी पॉईंट पहिले की आपण नक्की कुडाळमध्ये आहोत की मुंबईत ? असा प्रश्न मनाला पडतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भंगसाळ नदीवरील गणेश घाट आणि घन कचरा व्यवस्थापन केंद्र यांचा भूमिपूजन सोहळा दोनच दिवसांपूर्वी संपन्न झाला. या गणेश घाटामुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे कुडाळ शहर कायमचे कचरामुक्त होणार आहे. शिवाय लवकरच मच्छीमार्केट व नगरपंचायतीची नवी इमारत देखील लवकरच उभी राहणार आहे. यासोबतच अत्याधुनिक भाजी मार्केट व गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था उभारली जाणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या स्थानिक भाजीविक्रतांच्या डोक्यावर भाज्या उपलब्ध होणार असून ट्रॅफिकची समस्या देखील कमी होणार आहे. भविष्यात भंगसाळ नदीवर वॉटर स्पोर्ट सारख्या सुविधा सुरू करण्याचा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांचा मानस आहे. असे झाल्यास कुडाळ शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यास मदत मिळणार आहे. आमदार निलेश राणे यांनी पाहिलेलं एकविसाव्या शतकातलं कुडाळ शहराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
प्राजक्ता शिरवलकर यांची जिद्द आणि आमदार निलेश राणे यांचा खंबीर पाठिंबा यामुळे कुडाळवासीयांचे स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. प्राजक्ता शिरवलकर आज आपल्या नावाला साजेसं काम करत आहेत. प्राजक्ताचं फुल ज्याप्रमाणे सर्वांना सुगंध देतं त्याचप्रमाणे सर्वांना ‘आनंद’ देण्याचं काम त्या करत आहेत. ज्याप्रमाणे भगीरथाने कठोर तपस्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं त्याचप्रमाणे विकासगंगेला कुडाळमध्ये खेचून आणण्यात त्या नक्कीच यशस्वी होतील यात तिळमात्र शंका नाही. शिवाय आमदार निलेश राणे यांच्यासारखा गुरु पाठीशी असेल तर कोणत्याही यशाचं द्वार सहज खुलं होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील एकविसाव्या शतकातील कुडाळ शहरासाठी सिंधुदर्पण न्युज चॅनेलकडून मनःपूर्वक शुभेच्छा…


Subscribe







