बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या डॉ. श्रीनिवास रेड्डी खूनप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बांदा येथून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई बेंगलोर पोलिस व सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) संयुक्त पथकाने आज (शनिवारी) रात्री उशिरा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टीच्या वादातून डॉ. रेड्डी यांचा खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह साळीस्ते परिसरात सापडला होता, तर त्यांची गाडी तिलारी येथे आढळली होती. या भीषण प्रकरणात नऊहून अधिक आरोपींचा सहभाग असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या आरोपींपैकी चार जणांना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. सिंधुदुर्ग व बेंगलोर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून तपास जोरदार गतीने सुरू आहे.
दरम्यान, आज रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांदा सीमेवरील एका हॉटेलमधून आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले. या अटकेमुळे तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.