दीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द

चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण

सावंतवाडी : माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे लोकार्पण नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
या कामासाठी स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी आणि नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.

श्री. सुर्याजी व सौ. धारगळकर यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार केसरकर यांनी या हायमास्टसाठी ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा प्रकल्प पूर्ण होऊन लोकार्पण झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम. केसरकर यांनी ख्रिस्ती समाजाला या परिसरातील सोयीसुविधांबाबत शब्द दिला होता. सौरऊर्जा हायमास्ट कार्यान्वित झाल्याने केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला गेलाय. या लोकार्पण सोहळ्याला जुना बाजार परिसरातील ख्रिस्ती बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या भागातील प्रदीर्घ काळची मागणी पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित सर्वांनी आमदार दीपक केसरकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर यांचे आभार मानलेत. या उपक्रमामुळे चॅपेल गल्ली परिसर प्रकाशाने उजळून निघाला आहे.

error: Content is protected !!