तरुणीची छेड काढल्याप्रकरणी दोघे ताब्यात

कणकवली येथील घटना

कणकवली : शहरातील परी फॅमिली सलोन परिसरात शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. रस्त्यावरून जात असलेल्या एका तरुणीची परी सलोन मधील दोन तरुणांनी छेड काढली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी संबंधित सलूनसमोर मोठी गर्दी केली आणि सलून तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन तरुणांना ताब्यात घेतले. यावेळी संतप्त नागरिकांनी “त्या तरुणांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवतो,” असा इशाराही दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत संबंधित दोघांना पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात हलविले.

दरम्यान, या घटनेनंतर कणकवली पोलीस ठाण्याबाहेरही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकरणामुळे कणकवली शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!