कुडाळ : कुडाळ शहरात अचानक पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील चारही पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल उपलब्ध नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पेट्रोलची कमतरता भासू लागल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक वाहनचालक पेट्रोलसाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फेऱ्या मारताना दिसत आहेत. काही ठिकाणी वाहनांच्या रांगाही लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईसह इतर शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांचेही हाल होत असून प्रवास आणि दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. एकंदरीत पेट्रोल पुरवठा सुरळीत कधी होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.