कुडाळ येथे ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

कुडाळ : शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानातून आपल्याला प्रत्येक गावाचे बजेट तयार करायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बारकाईने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जागृत असेणे गरजेचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून जलदगतीने कामे झाली पाहिजेत.गावाच्या सरपंच पदाचा पदभार तुम्ही स्वीकारलाय. त्यादृष्टीने प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे.या अभियानाच्या माध्यमातून गावाचा निकष ठरणार आहे. त्यामुळे नुसते ऐकूण सोडून देऊन चालणार नाही. तर तुम्ही जे काम कराल ते कागदावर उतरले पाहिजे, असे आवाहन पंचायतन उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी शुक्रवारी येथे केले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती (कुडाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महालक्ष्मी सभागृहात ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तालुकास्तरीय कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर,ट्रेनर यशदा मास्टर संस्था (पुणे) च्या प्रसन्नता चव्हाण, सहाय्यक परीक्षाधीन गटविकास अधिकारी स्नेहा माने, पंचायत विस्तार अधिकारी संजय ओरोसकर व गजानन धरणे, लघु पाटबंधारे विभागाचे मंगेश हवालदार, सुनिल प्रभू, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. गवस आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उदघाटन श्री. परब व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियाना संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षक विभागाच्यावतीने दशावतार नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांनी या नाटकाला दाद दिली.
श्री. परब म्हणाले, आपण उत्पन्नाची साधने शोधली पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. अंगणवाडी व शाळाना लोक मोठ्या संख्येने मदत करतात.त्याचा योग्य उपयोग करून विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. शासनाच्या अनेक योजना असतात. त्याचा योग्य उपयोग करुन घेतला पाहिजे. सिंधुदुर्ग सोडला तर महाराष्ट्रातील लोकांनी मोठ्या प्रमाणात मनरेगा योजनेचा फायदा घेतला. आपल्या जिल्ह्यात जेवढा या योजनेचा फायदा होणे आवश्यक होते, तेवढा तो झाला नाही. सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. अडीच महिन्यात आपल्याला या अभियानाचे काम पूर्ण करायचे आहे.त्यासाठी तुम्ही जागृत असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.


डॉ. देवधर म्हणाले, सध्या शिक्षणामुळे गाव तर रिकामी होत नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकजण शिक्षण पूर्ण झाले की नोकर, व्यवसायाठी मुबंई, पुणे, गोवा येथे जातो. त्यामुळे गावात कोणीच राहायला बघत नाही. शासनाच्या या अभियानाचा फायदा तुम्ही गावाच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. गावाचा ग्रामसेवक म्हणून तुम्ही झपाट्याने कामे करा.ग्रामसेवकांनी काम करताना असे काम करा की रात्री तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे. आपल्याला सरकार पगार देते याची जाणीव असली पाहिजे. उपजिविकेची साधणे सुरक्षित करायची असतील तर संरक्षण करावे लागते. प्रत्येक ग्रामसेवकाचे श्रमदान जेव्हा होते तेव्हाच गाव बदलतो. अभियान कालावधी जे सरपंच, उपसरपंच जीव तोडून कामे करतील तेव्हाच गावाचा विकास होईल. गावाच्या विकासाठी मंदिर, शाळा, ग्रामपंचायत, सोसायटी, दुग्धसंकलन केंद्र यांची सांगड घालणे गरजेचे आहे.पुढच्या तीस वर्षात भागीरथ प्रतिष्ठान असे काम करेल की अख्खे जग पहायला आले पाहिजे. चौवीस तास लोकांच्या संपर्कात असणारा सरपंच हा खरा सरपंच असतो. या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरापर्यंत प्रश्न वेगळा असणार आहे असे तुमचे मत आहे. परंतु प्रश्न तोच असतो. त्यासाठी तुमची समजूत बदलणे गरजेचे आहे. ग्रामसेवकाचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. गावातील ग्रामसभा तुम्हाला यशस्वी करायची असेल तर सभेला अशी व्यक्ती बोलवा की ज्या व्यक्तीत ताकद आहे.


वीरसिंग वसावे म्हणाले, या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असणार असे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, आपण सर्वांनी या संधीचा फायदा करून घेऊया. या अभियानाचे काम जोराने करून हे अभियान यशस्वी करूया, असे त्यांनी सांगितले. आभार गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी मानले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामरोजगार सेवक, ग्रामविकास अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!