दोडामार्गात ९.८८ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी विजघर चेकपोस्टवर केलेल्या कारवाईत, गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोतून तब्बल ९ लाख ८८ हजार ५६० रुपयांची दारू आणि वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विजय सुरेश जाधव यांना विजघर चेकपोस्टजवळ एक संशयास्पद टेम्पो येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी सापळा रचला. १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, पोलिसांना एक पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (क्रमांक KA २७ B २६४२) दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता, त्यात रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्कीच्या गोवा बनावटीच्या कंपनी सिलबंद बाटल्या आढळून आल्या.

पोलिसांनी तात्काळ ही दारू आणि टेम्पो जप्त केला. जप्त केलेल्या दारूची किंमत ५,३८,५६० रुपये असून, टेम्पोची किंमत ४,५०,००० रुपये आहे. एकूण ९,८८,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र गंगाराम खरवत (वय-२१, रा. कुडासे वानोशीवाडी, ता. दोडामार्ग) या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक साटेलकर करत आहेत.

error: Content is protected !!