चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’

दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता

मराठा समाज हॉल, कुडाळ येथे

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ हा व्यावसायिक डान्स शो सर्वांच्या भेटीला येणार आहे. या शो च्या पोस्टरचे अनावरण आज चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर, अकॅडमीचे सल्लागार सुनिल भोगटे, उद्योजक उमेश पाटील, सौ. पाटील, नृत्यांगना दीक्षा नाईक, सौ. वेदिका सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता हा कार्यक्रम सर्वांच्या भेटीला येत असून सुंदरी फेम सेलिब्रिटी नृत्यांगना कु. दीक्षा नाईक सोबत १४ नृत्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत. अशी माहिती चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले की, चिमणी पाखरं डान्स अकॅडमीला २० वर्षे पूर्ण झाली असून ही अकॅडमी आता २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आतापर्यंत अकॅडमीने स्थानिक पातळीवर अनेक कार्यक्रम आयोजित केले. परंतु यावेळी एक वेगळे व नाविन्यपूर्ण पाऊल उचलावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अकॅडमीची विद्यार्थिनी दीक्षा नाईक सध्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या टीममध्ये काम करत असून लवकरच तिचा नवा प्रोजेक्ट सर्वांच्या भेटीला येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आशिष पाटील यांच्या टीममध्ये दिक्षाची निवड झाल्यानंतर अकॅडमीने एक वेगळी उंची गाठली आहे. यावेळी एका अशा कार्यक्रमाची आवश्यकता होती जो कार्यक्रम मुलांसाठी, पालकांसाठी आणि अकॅडमीसाठी व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल. शिवाय दिक्षा प्रमाणेच इतर मुलांसाठी देखील एक नवे दालन उभे रहावे या एकमेव हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले.

‘नृत्याचा सुरेख प्रवास’ अशी या शो ची टॅगलाईन असून या शोमध्ये आपल्याला विविध प्रकारची नृत्य पाहायला मिळणार आहेत. शिवाय आतापर्यंत सादर झालेल्या नृत्यांचा एक वेगळा प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे. या कार्यक्रमात बसवलेले डान्स, कोरिओग्राफी, वेशभूषा, लाईट सिस्टीम पाहताना सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फिटेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, नृत्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असून तारकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोष्टी मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमाची तयारी गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असून हा कार्यक्रम घेण्यासाठी मोठा खर्च होता. परंतु तारकाचे निर्माते आणि उद्योजक उमेश पाटील यांच्या सहकार्यामुळेच हे शिवधनुष्य पेलणे शक्य झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘तारका’ या शोमध्ये सुप्रसिद्ध नृत्यांगना दिक्षा नाईक सोबत आपल्याला संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, दुर्वा परब, विशाखा धामापूरकर, तनिषा नाईक, सलोनी सावंत, अंतरा ठाकूर, प्राची जाधव, युक्ती हळदणकर, चिन्मयी सावंत, निधी केळुसकर, प्राची पाटकर, निखिल कुडाळकर हे कलाकार आपली कला सादर करताना दिसणार आहेत. तसेच सुजय जाधव व तन्मय आईर हे या कार्यक्रमाच्या मॅनेजमेंट टीमचे सदस्य आहेत.

या कार्यक्रमामध्ये सर्वांसाठी मोफत प्रवेश असून सर्व कलाप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!