आंब्याची फांदी अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू

पडवे येथील घटना

सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील रानबांबुळी वायंगणकरवाडीतील यशवंत वामन वायंगणकर (वय ४१) यांचा आंब्याच्या झाडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना काल दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास पडवे शिर्केवाडी येथे घडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीला गेलेल्या कर्त्या पुरुषाचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत वायंगणकर हे शुक्रवारी झाड तोडण्याच्या कामासाठी गेले होते. झाड तोडण्याचे काम सुरू असताना त्यांनी एक मोठी फांदी दोरीच्या साहाय्याने सुरक्षितपणे खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी अचानक फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे वायंगणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत त्यांचे चुलत भाऊ गजानन वायंगणकर यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हातावर पोट असणाऱ्या मजुराचा कामावर असतानाच मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

error: Content is protected !!