“त्या” दहा हजारातील वाटेकरी शोधण्याची प्रसाद गावडेंकडून जिल्हा परिषद सीईओंकडे मागणी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग अधिनस्त येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील रुग्णवाहिकांवर आउटसोर्स पद्धतीने ३८ कंत्राटी वाहन चालक मे.तांडेल ग्लोबल कॉर्पोरेशन प्रा.लि. या संस्थेमार्फत भरणा केलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या महिन्यांचे मासिक वेतन देताना कंत्राटदाराने रु.५०००/- प्रति महिना असे १००००/- रुपये आगावू मागून घेतल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंनी उघडकीस आणत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दहा हजारातील “वाटेकरी” शोधण्यासाठी सखोल चौकशीची मागणी केली आहे. “त्या” कंत्राटी वाहन चालकांना १८०००/- रुपये (प्रति महिना) पगार त्यांचे खात्यावर अदा करत असल्याचे भासवत असून जिल्हा परिषद प्रशासनांची दिशाभूल करत असल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे. सेवा पुरवठादार जिल्हा परिषद प्रशासनाला वाहन चालकांना प्रति महिना १८०००/- वेतन दिल्याचे भासवत प्रत्यक्षात १३०००/- रुपये अदा करत असून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. या प्रकारामुळे ठेकेदाराने कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या आगावू १००००/- रुपयांमध्ये नेमके वाटेकरी कोण कोण आहेत याचा शोध घेण्याची विनंती गावडेंनी पत्राद्वारे केली आहे. यामध्ये
प्राप्त माहितीनुसार सेवा पुरवठादार या ३८ वाहन चालकांना “दहा हजार” संदर्भात कोणाकडे वाच्छता केल्यास कामावरून त्यांना चक्क कमी करण्याची धमकी दिली जात असून अशा पद्धतीने कामगारांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठीच या सेवा पुरवठादाराला निविदा देण्यासाठी जवळपास तीन महिने निविदा मंजुरी कार्यवाही लांबविली गेली होती का असा सवाल त्यांनी पत्रातून केला आहे. याआधीच्या ठेकेदाराने माहे नोव्हेंबर 2024 पासून कामगारांची भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम गिळंकृत करून कामगारांवर अन्याय केला असताना दुसरीकडे मासिक पगारातील रक्कम आगाऊ चेक द्वारे घेऊन कामगारांची केलेली लूट हा भयंकर प्रकार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी “दहा हजाराची” कोणाकडे वाच्छता केल्यास “नोकरीला मुकाल” अशा पद्धतीच्या धमक्या सेवा पुरवठादार नेमक्या कोणाच्या पाठींब्यावर देत आहे याची सखोल चौकशी करण्याची व ठेकेदारावर निविदेतील अटी व शर्ती भंग केले प्रकरणे व कामगार कायद्यांची पायमल्ली केल्याप्रकरणी कारवाईची मागणी प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे केली असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यासंदर्भात कठोर भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.


Subscribe








