सावंतवाडी : मध्यधुंद टेम्पो चालकांने येथील मच्छीमार्केट परिसरात थांबलेल्या तब्बल सहा दुचाकी चिरडल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
मात्र या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलीसांनी हा जमाव पांगवला. ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मच्छी मार्केट परिसरात घडली. दरम्यान या प्रकरणी संबंधित टेम्पो चालकासह मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सावंतवाडी पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी कळसुलकर इंग्लिश स्कूलसमोरील जिमजवळ काही दुचाकी उभ्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका मालवाहू टेम्पोने या दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर लगेचच टेम्पो चालकाचा संशयित दारूच्या नशेत असल्याचा आरोप दुचाकी मालकांनी केला.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र बराच वेळ होऊनही पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यामुळे नागरिक आणि दुचाकी मालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्यासह पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, संभाजी पाटील, मयूर निरवडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाला शांत केले आणि पुढील कारवाई सुरू केली. या अपघातामुळे रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान याप्रकरणी संबंधित टेम्पो चालकासह त्याच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्यावर गुंडा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


Subscribe





