बेकायदा गुरांची वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

कणकवली : फोंडाघाटाहून कोल्हापूरच्या दिशेने गुरांची सुरू असलेली वाहतूक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी रोखली. वाहतूक करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट चेकपोस्ट परिसरात घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

फोंडाघाटातून कोल्हापूरच्या दिशेने एका टेम्पोमध्ये भरलेली गुरे दोन व्यक्ती घेऊन जात होते. संशय आल्याने बजरंग दलाच्या कार्याकर्त्यांसह ग्रामस्थांनी वाहनाचा पाठलाग करून फोंडाघाट चेकपोस्ट परिसरात सदर वाहन रोखले. वाहनाची तपासणी केली असता त्यात दाटीवाटीने भरलेली गुरे होती. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गुरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले. वाहनातील गुरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!