हातिवले टोलनाक्यावर स्थानिक ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधी व वाहनचालक एकवटले
राजापूर : मुंबई गोवा महार्गावर राजापूर तालुक्यात वाटूळ पासून ते पुढे हातिवले टोलनाका ते पन्हळे टाकेवाडी खारेपाटण पर्यंत मोठया प्रमाणावर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यात मुकी जनावरे जखमी होत आहेत व मृत्युमुखीही पडत आहेत.
तर अपघात होऊन वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवीतासही मोठा धोका निर्माण होत आहे. यासाठी या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशा प्रकारे गुरे मोकाट सोडणाऱ्या गुरे मालकांवर कारवाई करावी व महामार्गावरिल प्रवास हा सुरक्षित करावा यासाठी सोमवारी हातिवले टोल नाक्यावर स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वाहन चालक व राजापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत प्रशासनाचे लक्ष वेधले.
अशा प्रकारे आपली गुरे मोकाट सोडून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या गुरे मालकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे एक लेखी निवेदन स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना यांच्या वतीने महामार्ग विभागाचे अधिकारी व राजापूर पोलीसांना देण्यात आले. याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक अपघात होत आहेत वाटुळ ते पन्हळे खारेपाटण दरम्यान मोठया प्रमाणावर फिरणारी मोकाट गुरे हे अपघाताचे मुळे कारण आहे,. हतिवले टोल नाका, राजापूर एसटी डेपोचा पुढे ब्रिजवर, ओणी, वाटुळ येथे अनेक ठिकाणी मोकाट गुरे रस्त्यावरती बसलेली असतात, यामुळे अनेक वेळा अपघात होत असतात. यात वाहनांचे नुकसान हातेच पण प्रवाशी जखमी होतात, मोकाट गुरेही जखमी होतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबधित विभागांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
या विरोधात सोमवारी हातिवले टोल नाक्यावर एकत्रित येत या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करताना अशा प्रकारे गुरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवरही कारवाई करावी, फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी महामार्ग विभागाचे श्री. कुमावत व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांना स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना यांच्या वतीने एक लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यवाही करण्याची ग्वाही कुमावत व यादव यांनी दिली आहे. याबाबत त्या त्या गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी संबधित गुरे मालकांना याबाबत माहीती द्यावी असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी अशफाक हाजू, दिपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, संदीप राऊत, प्रतीक सप्रे, कोदवली सरपंच प्रणोती भोसले, हातिवले सरपंच नाना गोटम, यांसह कोंडये सरपंच तसेच जुवाठीचे प्रसाद मोहरकर, प्रशांत जोशी, नाना पवार, दीपक धालवलकर, अजित घाणेकर, महेश कारेकर, प्रशांत मोंडकर, रवींद्र सावंत, सुरज मोरे, जयकांत मोरे, प्रदीप आंबवले विनायक बिंदूकडे, संजय तळवडेकर, दत्तात्रय तळवडेकर आदींसह हातिवले व कोंडये येथील रिक्षा चालक मालक संघटना पदाधिकारी व रिक्षा व्यवसायिक, वाहन चालक तसेच परिसरातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, हातिवले, तळगाव, पन्हाळे, वाटुळ, कोड्ये, उन्हाळे, राजापूर शहर, कोदवली, नेरके, खरवते ओणी, वाटूळ या गावातील ग्रामस्थ व वाहन चालक उपस्थित होते.
या प्रकरणी मंगळवारी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडण्यात येणार असल्याचे अरविंद लांजेकर यांनी सांगितले.














 
	

 Subscribe
Subscribe









