कणकवली तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये घडला प्रकार
कणकवली : तालुक्यातील महामार्ग लगतच्या एका हायस्कूलमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार बुधवार, १३ ऑगस्ट रोजी त्या हायस्कूलमध्येच घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील पालकांनी लक्ष वाढल्याचे समजते. त्यानुसार त्या शिक्षकावर बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
त्या शिक्षकाने विद्यार्थिनींना वारंवार चोरून बघण्याचे कृत्य केले. दरम्यान यावेळी त्या शिक्षकाला विचारणा केली असता दरवाजाच्या असलेल्या फटिना पत्रा लावत होतो असा खुलासा देखील त्या शिक्षकाने केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पीडितांनी घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात त्या शिक्षकाच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर भरोसा सेलच्या अधिकारी नलिनी शिंदे व पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी त्या हायस्कूलमध्ये भेट देत त्या शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पीडित व तिच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला. यापूर्वी देखील त्या हायस्कूलमध्ये असे काही प्रकार घडल्याची चर्चा कणकवली शहरामध्ये सुरू असून याप्रकरणी त्या शिक्षकाने यापूर्वी केलेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.













