महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक तथा कोकण विभाग सचिव नझीर शेख यांचा महाडमध्ये सन्मान

कुडाळ : महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक आणि कोकण विभागाचे सचिव नझीर शेख यांचा नुकताच महाड येथे संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. जकी अहमद जाफरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा गौरव सोहळा पार पडला.

महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात संघटनेच्या कोकण विभागासह महाराष्ट्रातील कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश संघटनेच्या आगामी सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे यशस्वी नियोजन करणे हा होता. या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान, संघटनेच्या कार्यासाठी आणि दिलेल्या योगदानाबद्दल नझीर शेख यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. हा सन्मान स्वीकारल्यानंतर बोलताना नझीर शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील सर्व कर्मचारी मित्रांचा आहे, जे मला संघटनेच्या कामात नेहमीच मदत करतात. तसेच, समाजातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आणि संघटनाप्रेमी आहेत, ज्यांनी मला सातत्याने सहकार्य केले, हा सन्मान त्यांचाच आहे आणि मी तो त्यांच्या वतीने स्वीकारत आहे.”

ते पुढे म्हणाले, “संघटनांनी माझा सन्मान करून माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढवली आहे. संघटनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला पात्र ठरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.” नझीर शेख यांच्या या मनोगताने उपस्थितांची मने जिंकली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

या बैठकीला संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात नागपूर कोषाध्यक्ष श्री. दारुणकर, विभागीय सचिव श्रीमती वंदना परिहार, रायगड सरचिटणीस नरेंद्र महाडिक, नागपूरचे सुधीर गभने, उपाध्यक्ष साळुंखे, विनायक जोशी, नाशिकच्या श्रीमती स्वाती डोकबाने, औरंगाबादच्या श्रीमती दिपाली खोबरे, अहमदनगरचे सुपेकर, मुंबईहून आपटे आणि राठोड, नितीन चव्हाण तसेच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि सचिव यांचा समावेश होता.

error: Content is protected !!