नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी केली कुडाळ शहरातील पूरस्थितीची पाहणी

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ शहरामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली. तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला.

गेले दोन दिवस कुडाळ शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरांमधून जाणारी भंगसाळ नदी तसेच ओहोळ, नाले हे पाण्याने दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे शहरात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील पूरबाधित असलेल्या नागरिकांनी स्थलांतर केले तसेच भैरववाडी कविलकाटे केळबाईवाडी येथे असलेल्या पूर बाधीत क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतर केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील आत्माराम कुडाळकर यांच्या घरावर सागाचे झाड कोसळले. ही घटना समजल्यावर नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून हे झाड तोडण्यात आले. या घटनेची पाहणी व पूर सदृश्य ठिकाणांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर यांनी केली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपंचायत सज्ज असल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगून (02362 – 222236), टोल फ्री 18002331436, गजानन पेडणेकर (9423819395) येथे संपर्क साधावा असे आवाहन केले.

error: Content is protected !!