कुडाळ-पाट मार्गावर भीषण अपघात

18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

म्हैस आडवी आल्याने गाडीवरचा ताबा सुटला

वेंगुर्ला : कुडाळ-पाट मार्गावर मंगळवारी रात्री करमळगाळू एसटी स्टॉपजवळ एका इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला, ज्यात १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कारचालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोचरा येथील दत्ताराम राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परुळे कुशेवाडा येथील ३२ वर्षीय चंद्रकांत सुरेंद्र परुळेकर हे आपली इर्टिगा कार (एमएच ०७ एजी ४९९५) घेऊन पाट गावाकडे जात होते. गाडीत त्यांच्यासोबत रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत (वय १८) हा होता. रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास, करमळगाळू येथील एसटी स्टॉपजवळ अचानक एक म्हैस रस्त्यावर आडवी आल्याने चालकाने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन गटारात जाऊन पडली.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीतील रोहन उर्फ अक्षय सावंत याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक चंद्रकांत परुळेकर किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी चालकाला रोहनच्या मृत्यूसाठी जबाबदार धरून निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शेट्ये हे सहा. पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

error: Content is protected !!