एकटाच राहत होता युवक
वेंगुर्ले : गेल्या मंगळवारी, २९ जुलै रोजी मानसी पूल येथील खडीच्या पाण्यात तरंगताना आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे. मृतदेह कॅम्प भटवाडी येथील विश्राम अरविंद सावंत (३७) यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची बहीण गौरांगी सावंत हिने ही ओळख पटवली.
विश्रामची कोल्हापूर येथे राहणारी बहीण गौरांगी सावंत रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरी आली होती. गेल्या दोन वर्षांपूर्वी आई आणि सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यापासून विश्राम घरात एकटाच राहत होता. त्याची मावशी, स्मिता माधव वागळे, अधूनमधून त्याची चौकशी करत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो घरी नव्हता. त्यामुळे तो एखाद्या तीर्थस्थानी गेला असावा, असा अंदाज मावशीला होता.
वेंगुर्ले पोलिसांनी मानसी पुलाजवळ पाण्यात पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू केल्याची माहिती गौरांगीला मिळाली. त्यानंतर तिने मावशीसोबत वेंगुर्ले पोलीस स्टेशन गाठले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे अवघड होते, पण गौरांगीने मृतदेहावरील काही खुणा, अंगावर असलेली सोन्याची साखळी आणि इतर माहिती पोलिसांना दिली. ही माहिती जुळल्याने बहीण आणि मावशी यांनी तो मृतदेह विश्राम सावंत यांचाच असल्याचे निश्चितपणे सांगितले.
गेल्या महिन्यात गौरांगीने विश्रामच्या मोबाईलवर दोन वेळा फोन केला होता, पण त्याने तो उचलला नव्हता, असे तिने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करत आहेत.













