दोन डंपरसह डंपरचालक ताब्यात
कुडाळ येथील घटना
कुडाळ : तालुक्यात एका डंपर चालकाने महसूलचे पथक असलेल्या गाडीवर डंपर घालून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरूर ते कुडाळ एम.आय.डी.सी. भागात शनिवारी दुपारी घडली. यातील एका डंपरची नंबरप्लेट बोगस असण्याचे निदर्शनास आले. दरम्यान डंपर चालकाने डंपरमधील वाळू रस्त्यातच ओतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन डंपरसह डंपर चालकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोन्ही डंपर चालकांवर कुडाळ पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ महसूलच्या पथकाने चेंदवण व कवठी गावातील अनधिकृत वाळूचे रॅम्प काल उध्वस्त केले. ही कारवाई करून महसूल चे पथक कुडाळ येथे जात असताना मालवणहून कुडाळच्या दिशेने येणारे दोन डंपर आढळले. यावेळी पथकाने डंपर चालकांना हाताने डंपर थांबवण्याची विनंती केली. यातील एक डंपर चालक थांबला. परंतु दुसऱ्या डंपर चालकाने डंपरसह तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी महसूलच्या पथकाने त्या डंपरचा पाठलाग करत काही वेळाने डंपरच्या समोर कार नेत डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपर चालकाने आपल्या ताब्यातील डंपर कारवर घातला. यावेळी डंपरचे पुढील चाक कारच्या मागील चाकाच्या दिशेने धडकले. तरी देखील डंपर चालक तेथे न थांबता आपल्या ताब्यातील डंपर घेऊन पळून गेला. काही वेळाने डंपर मधील वाळू रस्त्यावर ओतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना या डंपर चालकाला महसूलच्या पथकाने पकडले. यानंतर कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल होत दोन्ही डंपर चालकांना डंपर सह ताब्यात घेतले.













