२३ नोव्हेंबर पासून ढगाळ वातावरण आणि पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
ब्युरो न्यूज: अवकाळी पावसामुळे सोन्या सारखं आलेलं पीक वाहून,कुजून गेल्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे.त्यातच राज्यात पुन्हा एकदा पावसाचे सावट डोकावूं पाहत आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाल्याने तिकडून पुन्हा बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात थंडीला सुरुवात होत नाही तोच पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच दिवस राहणार असून 23 पासून पुन्हा ढगाळ वातावरण अन् पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्यामुळे थंडीत खंड पडणार आहे. कोकणात थंडीला नुकती कुठे सुरुवात झाली होती. मात्र बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने राज्यात थंडीचा मुक्काम अवघे दोनच दिवस म्हणजे 22 नोव्हेंबरपर्यंत राहील, असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 23 पासून 25 पर्यंत ढगाळ वातावरण राहील तर 26 पासून राज्यातील बहूतांश भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सरकार कडून तुटपुंजी मदत यामुळे शेतकरी हवालदिल
आंबा काजू बागायतदार असो किंवा शेतकरी निसर्गाच्या ह्या अवेळीच्या खेळी मुळे हतबल झाले असून केलेल्या श्रमाचे फळ पदरात पडायच्या आधीच निसर्ग हिरावून घेत आहे.त्यातच सरकारने केलेल्या योजना कागदावरच राहिल्या मुळे कित्तेक शेतकरी बागायतदार नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत.तर काही शेतकरी आणि बागायत दार यांना मिळालेली नुकसान भरपाई देखील कमी असल्याचं वक्तव्य शेतकरी बागायतदार करत आहेत.