पिंगुळीत रेल्वेचे लोखंडी रुळ चोरी होऊनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने शिवसेना आक्रमक

कणकवली आरपीएफ कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिली धडक

पिंगुळी येथील स्मशानभूमीसाठी वापरले चोरी केलेले लोखंडी रुळ

आठ दिवसांत दोषींवर कारवाई करा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा मा. आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा

        पिंगुळी येथे कोकण रेल्वेच्या लोखंडी रुळांची चोरी करून ते रूळ पिंगुळी देऊळवाडी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आले. ग्रामस्थांनी यावर आवाज उठविताच स्मशानभूमीला लावलेले लोखंडी रुळ काढून ते गायब करण्यात आले आहेत. याबाबतची  लेखी तक्रार कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे  देऊन महिना झाला आणि कणकवली रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना यांची माहिती असूनही संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल केले नाहीत  त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी येथील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कार्यालयात धडक देत आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना याचा जाब विचारला. यावेळी या घटनेची तक्रार देणाऱ्या दीपक राऊळ यांनाच राजेश सुरवाडे यांनी उलट सुलट प्रश्न विचारल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत  हीच तत्परता गुन्हा दाखल करण्यासाठी का दाखवली नाही, ग्रामस्थांच्या  तक्रारीची दखल का घेतली नाही असा संतप्त सवाल केला.  
        याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,कणकवली तालुका संघटक राजू राठोड,शिवसेना विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर,पिंगुळी ग्रामस्थ दीपक राऊळ,  चेतन राणे, दीपक धुरी, केतन शिरोडकर, नामदेव पिंगुळकर, सचिन ठाकूर, साज खान, रामा पिंगुळकर, संतोष सावंत आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

      दरम्यान यावेळी ग्रामस्थ व शिवसैनिकांनी 'रेल्वे रुळाची चोरी करणाऱ्यांचा आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या रेल्वे पोलिसांचा, निषेध असो' अशी जोरदार घोषणाबाजीही केली.  स्मशानभूमीला रेल्वे रुळाचा वापर करण्यात आल्याचा २ जूलैचा जिपीएस मॅप द्वारे काढलेला फोटोही वैभव नाईक यांनी श्री. सुरवाडे यांना दाखविला. त्यावेळी श्री. सुरवाडे यांनी सुरुवातीला आपल्याकडे कोणाची तक्रार आली नाही असे सांगितले पण नंतर  कोकण रेल्वेचे वरिष्ठ शाखा अभियंता संतोष कदम यांच्याकडे पिंगुळी ग्रामस्थांनी २० जूलैला तक्रार केली होती त्यानुसार आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली हे मान्य देखील केले मात्र, तेथे काहीही दिसून आले नाही, असे आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांनी सांगितले.
      दरम्यान सदर रुळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ठेवलेले होते, ते रूळ  लाला नामक  भंगार व्यवसायिकाने कापून  संबंधित सरपंचाच्या ताब्यात दिले आहेत. त्यामुळे या भंगार व्यवसायिकाची चौकशी करा, अशी मागणी परशुराम उपरकर व ग्रामस्थांनी केली.
    अखेरीस ग्रामस्थांकडून फोननंबर घेऊन सुरवाडे यांनी भंगार व्यवसायिक लाला याला फोन करून विचारणा केली असता रूळ आपणच कापून दिल्याचे त्याने मान्य केले त्यामुळे सुरवाडे यांनी त्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत आरपीएफच्या कणकवली कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. भंगार व्यवसायिकाची कसून चौकशी केली जाईल, असे आश्वासनही सुरवाडे यांनी आंदोलकांना दिले. तर या घटनेची कसून चौकशी व्हायला हवी. कारण, रेल्वेच्या साहित्याची विनापरवाना उचल करून त्याचा वापर स्मशानभूमीसाठी करणे, ही गंभीर बाब आहे, असे परशुराम उपरकर, वैभव नाईक, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, राजू राठोड यांनी सांगितले. 
    यावेळी वैभव नाईक यांनी आरपीएफच्या बेलापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही मोबाईलद्द्वारे संपर्क साधत  या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आणि दोषींवर कारवाई न झाल्यास आठ दिवसांनी शेकडोंच्या संख्येने पुन्हा एकदा कणकवली आरपीएफ कार्यालयावर  आंदोलन करू असा इशाराही वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी दिला.
error: Content is protected !!