गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर वैभववाडी पोलिसांकडून जप्त

३६.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वैभववाडी: करुळ तपासणी नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत, गोवा बनावटीची दारू घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आहे. या कंटेनरमध्ये तब्बल ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीचे दारूचे १,१०० बॉक्स आढळले आहेत. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली.

गोवा राज्यातून अवैध मार्गाने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैभववाडी पोलिसांनी करुळ तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली होती. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी एका संशयित कंटेनरला थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू लपवून ठेवल्याचे समोर आले.

पोलिसांनी तात्काळ कंटेनर ताब्यात घेऊन तो वैभववाडी पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर दारूच्या बॉक्सची मोजणी करण्यात आली. या मोजणीनुसार, कंटेनरमध्ये एकूण १,१०० बॉक्स होते, ज्यांची अंदाजे किंमत ३६ लाख ९६ हजार रुपये आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचा चालक नवीन सुरेश कुमार (वय २९, रा. हरियाणा) आणि मालक तथा क्लीनर वीरेंद्र भगत सिंग (वय ४२, रा. हरियाणा) या दोघांनाही अटक केली आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अवैध दारू वाहतुकीवर वैभववाडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

error: Content is protected !!