आंबोलीतील प्रसिद्ध हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

आंबोली: आंबोली येथील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात भाजपचे हिंदू समर्थक सरकार असतानाही, धार्मिक स्थळांच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक आणि पर्यटक विचारत आहेत. या रस्त्याच्या कामात वन विभाग अडथळा आणत असल्याचा आरोपही होत आहे.

वन विभागावर गंभीर आरोप

स्थानिक नागरिकांच्या मते, हिरण्यकेशीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होण्यास वन विभाग जबाबदार आहे. रस्त्याची स्थिती इतकी खराब आहे की अनेक वाहने तिथे अडकून पडतात. यामुळे पर्यटकांना आपली वाहने दूर लावून पायी जावे लागते. या परिस्थितीचा फायदा घेत, वन विभागाचे कर्मचारी स्वतःच पर्यटकांना त्यांच्या गाड्यांमध्ये बसवून पैसे कमवत आहेत, असा आरोपही होत आहे.
जंगल आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याऐवजी वन विभागाचे कर्मचारी पर्यटन व्यवसायात गुंतले आहेत. वन विभाग स्वतः पैसे कमवत असताना, रस्त्याचे काम का अडवत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या खात्याच्या कामावर सरकारचे नियंत्रण आहे की नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

आमदार केसरकर यांच्या आश्वासनांची पूर्तता नाही

स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याची अनेकदा घोषणा केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. एका बाजूला सरकार हिंदूंच्या हिताचे रक्षण करत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे धार्मिक स्थळांची अशी दुर्दशा होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असताना, प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते तरी सुस्थितीत असायला हवेत, अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करत आहेत.

हिरण्यकेशी मंदिराचे महत्त्व

‘अरण्य काशी’ या प्राचीन नावाचा अपभ्रंश होऊन या मंदिराला ‘हिरण्यकेशी’ नाव पडले आहे. हे एक महत्त्वाचे शिवस्थान आणि तीर्थस्थान आहे. वर्षभर येथे भाविक दर्शनासाठी येतात, विशेषतः श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी होते. या ठिकाणी हिरण्यकेशी नदीचा उगम होतो, जिला पवित्र काशी गंगा मानले जाते. त्यामुळे अस्थी विसर्जनासाठीही हे ठिकाण पवित्र मानले जाते.

अशा पवित्र स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची ही दुरवस्था पाहून भाविक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हिंदू सरकार धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचीच अशी उपेक्षा करत असेल, तर इतर जिल्ह्यांची स्थिती काय असेल, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. भ्रष्ट अधिकारी आणि वनविभागाच्या कामावर सरकार कारवाई करणार का, असा सवाल स्थानिक आणि पर्यटक विचारत आहेत.

error: Content is protected !!