मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून गेला होता
आचरा: आचरा पिरावाडी येथील ४२ वर्षीय भालचंद्र मेघश्याम कुबल, जे काही दिवसांपासून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहिरीत आढळून आला आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
भालचंद्र कुबल शनिवार, २६ जुलै रोजी पहाटेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा शोध घेतला होता. त्यानंतर, २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे बंधू संतोष कुबल यांना घराच्या आवारातील विहिरीत भालचंद्र यांचा मृतदेह तरंगताना दिसला.
या घटनेची माहिती तत्काळ आचरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. आचरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ (बबन पडवळ) आणि पोलिस घाडीगावंकर करत आहेत. भालचंद्र कुबल यांच्या पश्चात मुली, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.