वारंवार लक्ष वेधून देखील प्रशासन निद्रिस्त
ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजवले
कुडाळ : वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील रस्त्याची पार दुरावस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वेताळ बांबर्डे कदमवाडी व नळ्याचा पाचा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत आज रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले.
वेताळ बांबर्डे भोगलेवाडी ते कदमवाडी शाळेपर्यंतच्या रस्त्याची पार चाळण झाली असून नक्की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हे देखील कळत नाही. वेताळ बांबर्डे कदमवाडी या भागात मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते. या भागातून वाहने हाकताना वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचदा या खड्ड्यांमधून वाहने हाकताना खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. त्यामुळे पादचाऱ्यांमधून देखील नेहमी संताप व्यक्त केला जात होता. तसेच धोकादायक वळणावर झाडी वाढल्यामुळे देखील अपघाताची शक्यता होती.
या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दिनांक १ ऑगस्टपासून एस. टी. बसची वाहतूक देखील या मार्गाने बंद होणार होती. याचा वयोवृद्ध व्यक्ती, स्थानिक भाजी विक्रेते यांच्यासह विद्यार्थ्यांना बसणार होता. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थानी आज स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून सगळे खडे बुजवले. तसेच धोकादायक वळणावरील झाडी देखील ग्रास कटरच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आली.














