कणकवली: कणकवली तालुक्यातून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (आज) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, मुलीच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी गुरुवारी रात्री ११ वाजता जेवण करून झोपली होती. मात्र, सकाळी ६ वाजता ती घरात नसल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने तिचा शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळली नाही.
मुलीच्या चुलत्याने कणकवली पोलिसांत धाव घेत, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पुतणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३६३ (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कणकवली पोलीस अधिक तपास करत असून, मुलीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.