त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी
सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माडये यांची वेंगुर्ला तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
वेंगुर्ला : काही दिवसांपूर्वी कोरजाई येथील बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतचे वृत्त प्रसारित होताच यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी वाळू उत्खनन सुरू असून परुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माडये यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी वेंगुर्ला तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरजाई खाडीमध्ये अवैध वाळू उत्खनन सुरू होते. परंतु परुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आपल्या आर्थिक फायद्यासाठी वाळू उत्खननावर कारवाई न करता दबावतंत्र वापरून केवळ वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. सदर बाब गंभीर स्वरूपाची असून त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माडये यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार वेंगुर्ला यांच्याकडे सुपूर्त केले आहे. तसेच यापुढे असे घडल्यास सबंधित वाळू उत्खनन करणाऱ्यांवर या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी करण्यात आलेल्या कायद्यानुसार कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.