कोकणकन्या एक्स्प्रेसमधून पडून तरुणाचा मृत्यू

कणकवलीजवळ घडली घटना

कणकवली : मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून (गाडी क्रमांक २०१११) पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय २९, रा. चिपळूण, रत्नागिरी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यातील जानवली येथे ही घटना घडली.

या घटनेची माहिती कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर अनंत चिपळूणकर यांना नांदगाव ते कणकवली रेल्वे स्टेशनदरम्यान जानवली येथे मिळाली. त्यांनी तात्काळ रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव यांना कळवले. सहाय्यक उपनिरीक्षक यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहुल सावर्डेकर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर दुखापत झाली होती.

तात्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून राहुलला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाची तपासणी केली असता, त्याच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये असलेल्या पाकिटात आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, एटीएम कार्ड आणि इतर कागदपत्रे मिळाली. त्यावरून त्याची ओळख राहुल संतोष सावर्डेकर अशी पटली.

रेल्वे सुरक्षा दलाला प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सावर्डेकर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करत होता. तो दरवाजाजवळ उभा असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो रेल्वेतून बाहेर पडून एका दगडावर आपटला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश यादव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली आहे.

error: Content is protected !!