पाच रॅम्प उद्ध्वस्त
वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यात कोरजाई खाडी नजीक सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज तहसीलदार ओंकार ओतारी यांनी मोठी कारवाई केली. सायंकाळच्या सुमारास निवती पोलिसांच्या मदतीने पाच अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमुळे कोरजाई गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, रॅम्प मालक आणि वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेली अनेक वर्षांपासून कोरजाई खाडीत बोटींद्वारे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू होते. विशेष म्हणजे, सध्या शासनाने वाळू उपशाला बंदी घातली असतानाही, जुलै महिन्यात या खाडीत आठ बोटींद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात होती. याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी खाडीकिनारी पाच अनधिकृत रॅम्प तयार केले होते.
या कारवाईला काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनातील घडामोडींची पार्श्वभूमी आहे. आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत कोरजाई खाडीतील अवैध वाळू उपशाचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरजाई खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सभागृहात दिले होते. अखेर, आज तहसीलदार ओंकार ओतारी यांनी धडक कारवाई करत हे आदेश प्रत्यक्षात आणले.
या कारवाईमुळे कोरजाई गावातील ग्रामस्थांमधून तीव्र समाधान व्यक्त होत आहे, कारण त्यांच्या परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा अवैध व्यवसाय थांबला आहे. या कारवाईत निवती पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशिष किनळेकर, पोलीस हवालदार पराग पोकळे, पोलीस पाटील जानवी खडपकर आणि अन्य महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.