लाचखोर तलाठी जाळ्यात

मालवणमध्ये ४००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडला!

मालवण : जमिनीच्या वारस तपासणीसारख्या सामान्य कामासाठीही सर्वसामान्यांकडून लाच घेण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. मालवण येथील मसुरे तलाठी निलेश किसन दुधाळ (वय २६) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ४,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा किळसवाणा चेहरा पुन्हा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन अर्जदारांनी जमिनीच्या वारस तपासणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे एका व्यक्तीमार्फत तलाठी कार्यालयात जमा केली होती. मात्र, हे अर्ज अनेक दिवस प्रलंबित होते. याबाबत तलाठी दुधाळ यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने प्रत्येक वारस तपासणी अर्जासाठी २,००० रुपये, असे एकूण ४,००० रुपयांची मागणी केली. लाच मागितल्याने संतप्त झालेल्या अर्जदारांनी थेट सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली.

या तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, निलेश दुधाळ हा ४,००० रुपये स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर दुधाळला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांनी दिली.

भ्रष्टाचाराला आळा कधी बसणार?

शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य माणसांची कामे वेळेत आणि विनासायास होणे अपेक्षित असताना, अनेकदा लाचेशिवाय काम होत नाही, असा अनुभव नागरिकांना येतो. तलाठी दुधाळसारख्या तरुण अधिकाऱ्यानेही तात्पुरत्या पैशासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कारवाईमुळे नागरिकांच्या मनात थोडा दिलासा मिळाला असला तरी, महसूल विभागातील हा खोलवर रुजलेला भ्रष्टाचार कधी संपुष्टात येणार, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रीतम कदम, जनार्दन रेवंडकर, गोविंद तेली, विजय देसाई, अजित हंडे, स्वाती राऊळ, योगेश मुंडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर आणि सुहास शिंदे यांनीही या कारवाईसाठी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!