सावंतवाडीत येथे पुराच्या पाण्यात वाहून ३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आंबगाव-रूपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी (वय ३८) या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या प्रवाहाने त्यांचा बळी घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास रूपणवाडी येथील पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यातून प्रशांत दळवी चालत जात होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते अचानक प्रवाहाबरोबर वाहून गेले. ही माहिती मिळताच आंबेगाव ग्रामस्थांसह पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, रात्रीच्या गडद अंधारामुळे ही मोहीम थांबवण्यात आली.

आज सकाळी कुणकेरी येथील रवीचे भाटले येथे प्रशांत दळवी यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी शरद लोहकरे, श्री. धोत्रे, श्री. सावंत आणि पोलीस हवालदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

यावेळी आंबगावचे सरपंच शिवाजी परब, पोलीस पाटील लक्ष्मण गावडे, उपसरपंच रमेश गावडे आदी उपस्थित होते. प्रशांत दळवी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ आणि भावजयी असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आंबगाव आणि रूपणवाडी परिसरात सध्या शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!