कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे-माधववाडी येथे २१ वर्षीय मंदार मनोज राजापूरकर या तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदार गवंडी कामासाठी जात असे. रविवारी रात्री तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला. काही वेळानंतर तो घरातील सामान ठेवण्याच्या खोलीत गेला आणि त्याने छप्पराच्या वाशाला पाणी काढण्याच्या दोरीने गळफास लावून घेतला. रात्री ९:३० च्या सुमारास त्याच्या वडिलांनी, मनोज कृष्णा राजापूरकर यांनी, मंदारला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहिले.
या घटनेची माहिती त्वरित ग्रामस्थांना देण्यात आली. वाडीवरवडे पोलिस पाटील प्रशांत धुरी यांनी कुडाळ पोलीस ठाण्याला घटनेची कल्पना दिली. सहाय्यक उपनिरीक्षक ममता जाधव आणि शांताराम वराडकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. उपनिरीक्षक प्रवीण धडे यांनीही घटनास्थळी पाहणी केली.
सोमवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण आढाव यांनी मंदारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंदारने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुडाळ पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









