विजयदुर्ग : जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश ‘युनेस्को’ च्या वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. ही नक्कीच सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बाब आहे.पर्यटकांना तसेच इतिहास अभ्यासकांना या घटनेमुळे प्रेरणा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या १२ किल्ल्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना अधिक स्फूर्ती देणार आहे. जिल्ह्यातील हे दोन किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांची जबाबदारी देखील वाढली आहे. आता येथे पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने गावकऱ्यांनी पर्यटनातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सरपंच रियाज काझी, प्रदीप मिठबावकर, दिनेश जावकर, इतिहासप्रेमी राजेंद्र परूळेकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिड्ये, शैलेश खडपे उपस्थित होते .