मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
ब्युरो न्यूज: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली.
पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू
महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिश्यामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो. निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते.त्यानुसार, मार्च २०२५ चे मानधन २५ एप्रिल २०२५ मध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे २०२५ मध्ये अदा करण्यात आले असून, सद्य:स्थितीत मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्त्वावरील आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.