कुडाळ पिंगुळीत घटना
कुडाळ : विश्रांती घेण्यासाठी मित्राच्या घरी आलेले दोन गवंडी कारागीर लाखाहून अधिक किमतीच्या गवंडी कामाशी संबंधित १५ वेगवेगळ्या मशिनरी चोरून पळाल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात रविवारी दुपारी घडली आहे. परप्रांतीय गवंडी कारागिराच्या ही बाब लक्षात येताच त्याने कुडाळ पोलीस ठाणे गाठले. चोरी करणारे दोघे संशयितही परप्रांतीयच असून, उशिरापर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंगुळी गावात राहणारा एक परप्रांतीय गवंडी कारागीर गवंडी कामाशी संबंधित सर्व प्रकारची कामे करतो. त्यामुळे त्याच्याकडे या कामासाठी लागणाऱ्या विविध मशिनरी आहेत. रविवारी सकाळी त्याचे दोन मित्र त्याच्या घरी आले. ते दोघेही गवंडी कारागीरच आहेत. ‘आज आपल्याला काम नाही, तुझ्या खोलीत विश्रांती घेतो,’ असे त्या दोघा मित्रांनी सांगितले. मित्रानेही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरात राहण्यास सांगितले आणि तो आपल्या कामावर निघून गेला.
सायंकाळी कामावरून घरी परतल्यावर त्या गवंडी कारागिराला ते दोघे मित्र घरात नसल्याचे दिसले. तसेच घरात ठेवलेल्या सर्व मशिनरी गायब झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने त्या दोघांपैकी एकाशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, ‘आम्ही मशिनरी घेऊन गेलो आहोत, तुला काय करायचे ते कर,’ असे उद्धट उत्तर त्याला मिळाले.
तत्काळ या गवंडी कारागिराने कुडाळ पोलीस ठाणे गाठून ही घटना पोलिसांना सांगितली. लादी कटिंग करणे, मोल्डिंग करणे, तसेच कलर संबंधित विविध प्रकारच्या एकूण १५ मशिनरी त्या दोघांनी चोरून नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यात, त्याने आपल्या भावाला सांगून अलीकडेच आणलेल्या दोन नवीन मशिनरींचाही समावेश आहे. एवढेच नाही तर, खोलीतील पाच हजार रुपये रोख रक्कमही त्यांनी चोरून नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.