अंगावर पेट्रोल ओतून घेतले
नेरूर येथील घटना
कुडाळ : नवरा, सासू, सासऱ्याने मानसिक व शारीरिक छळ केला म्हणून कणकवली नाटळ येथील अंकिता रणवीर कदम (वय ३४) या विवाहितेने नेरूर रावलेवाडी येथील माहेरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नवरा रणवीर प्रकाश कदम (वय ३५) व सासरे प्रकाश गणपत कदम (वय ७०) यांना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे याबाबत विवाहितेचे वडील सुभाष झिलू नेमण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेरूर रावलेवाडी येथील सुभाष नेमण त्यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की त्यांची मुलगी अंकिता कदम हिला नाटळ येथे रणवीर कदम याच्याशी लग्न करून देण्यात आले. हे लग्न एप्रिल २०२२ मध्ये झाले. त्यानंतर त्यांना मुलगी झाली ती सध्या दोन वर्षाची आहे. दरम्यान बुधवारी २ जुलै रोजी संध्या. ६ वाजण्याच्या सुमारास तिचे सासरे प्रकाश कदम तिला रिक्षेने घेऊन नाटळवरून नेरूर येथे आले व तुमची मुलगी घरी काही काम करत नाही तिला तुमच्या घरी ठेवून घ्या असे सांगून ते निघून गेले. माहेरी आलेल्या अंकिता कदम हिने मध्यरात्री घरी ग्रास कट्टर साठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन पेटवून घेतले. तिला वाचवण्यासाठी माहेरच्या लोकांनी प्रयत्न केले. मात्र ती जास्त प्रमाणात जळाली. तिला तात्काळ ओरोस येथील जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचे वडील सुभाष नेमण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात नवरा सासू-सासरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलीचा तिचा नवरा सासू सासरे छळ करत होते असे म्हटले आहे. यावरून नवरा रणवीर कदम व सासरे प्रकाश कदम यांना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली अडकुर करीत आहेत.













