देवगड तालुक्यातील घटना
देवगड : पावणाई धुरीवाडी येथील रेश्मा चंद्रकांत सावंत (४५) या अपंग महिलेचा मृतदेह तिच्या घरानजीकच असलेल्या मोंड- वानिवडे खाडीपात्रात सोमवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रेश्मा सावंत ही आपल्या आई व काकीसमवेत राहत होती. रविवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास ती आपल्या घरासमोर फेरफटका मारत होती. काही वेळाने ती तेथे दिसेनाशी झाल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, ती सापडू शकली नाही. याची माहिती नातेवाईकांनी मुंबई दहिसर (पूर्व) येथे वास्तव्यास असलेला तिचा भाऊ प्रकाश चंद्रकांत सावंत (५३) यांना दिली. प्रकाश सावंत हे सोमवारी सकाळी पावणाई धुरीवाडी येथे आपल्या गावी आले. त्यांनी नातेवाईक व स्थानिक ग्रामस्थांसमवेत रेश्मा हिचा शोध घेतला. यावेळी तिचा मृतदेह घरानजीक असलेल्या मोंड- वानिवडे खाडीपात्रात आढळून आला. प्रकाश सावंत यांनी घटनेची माहिती देवगड पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. खाडीपात्रात तोल गेल्याने रेश्मा हिचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.