शिक्षक समितीचे प्रत्युत्तर
कणकवली : शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून दुसऱ्या संघटनेत जात असल्याचे म्हणणाऱ्या गिल्बर्ट फर्नांडिस यांनीच चुकीचा कारभार केल्याने शिक्षक समितीने त्यांना अडीच वर्षे कोणत्याही पदापासून दूर ठेवले होते.शिक्षकांच्या विश्वासाला त्यांनी यापूर्वीच तडा घालविला असल्याने त्यांच्यावर पदासाठी दुसऱ्या संघटनेची वळचन धरावी लागली आहे. असे रोखठोक प्रत्युत्तर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी फर्नांडिस यांना लगावले आहे.
फर्नांडिस यांचेसह काहींनी अन्य संघटनेत प्रवेश करताना शिक्षक समितीवर आरोप केले होते.यावर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी या आरोपांचा समाचार घेतला आहे.
शिक्षक समितीमध्ये लोकशाही असून दर तीन वर्षांनी संघटनेचे तालुका,जिल्हा ,राज्य पदाधिकारी लोकशाही मार्गाने निवडण्यात येतात.परंतु फर्नांडिस ज्या संघटनेत दाखल झालेत तिथे कोणत्याही वेळी व्यासपीठावरच पदे जाहीर केली जातात,कारण प्रवेशाच्या कार्यक्रमात सकाळी जिल्हा सचिव असलेल्या व्यक्तीचे पद दुपारी रिक्त होते व ते फर्नांडिस यांना मिळते.चार महिन्यांपूर्वीच ज्या पदावर या व्यक्ती आल्या होत्या त्यांना अशाप्रकारे बाजूला सारण्याची वेळ फर्नांडिस यांच्या पदाच्या लालसेपोटी आली हे त्रिवार सत्य आहे.शिक्षक समितीत चुकीचा कारभार केल्याने फर्नांडिस यांचेसह काहींना शिक्षक समितीने दोन वर्षे सामान्य सभासद म्हणून सुद्धा नाकारले होते.त्यावेळी अन्य काही संघटनांची प्रवेशासाठी चाचपणी यांनी केली होती,परंतु काही संघटनांनी त्यांना घेण्यास सपशेल नकार दर्शविल्याने नाविलाज म्हणून ते आता पदांची खिरापत वाटणाऱ्या संघटनेत गेले आहेत.त्यांनी तिथे खुशाल कार्यरत रहावे परंतु शिक्षक समितीवर आरोप केल्यास आपल्या कारभाराची लक्तरे वेशीवर आणली जातील हे ध्यानात घ्यावे.तसेच पदांसाठी अन्य संघटनेत प्रवेश घेऊन शिक्षक समिती सोडून जाणाऱ्यांची सद्या काय स्थिती आहे हे सर्वज्ञात आहे.असे कित्येक धक्के शिक्षक समितीने झेलले आहेत त्यामुळे शिक्षक समितीला हा प्रसंग सुद्धा नवीन नाही.शिक्षक समिती प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्त्यांमुळे अभेद्य आहे आणि अढळ राहील.असे शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी म्हटले आहे.


Subscribe









