चोरटा पोलिसांच्या रडारवर
कणकवली : येथील कलमठ, बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांहून अधिक मुद्देमाल चोरल्याप्रकरणी लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (२८, रा. पंढरपूर, सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या सोबत आणखीन एका चोरट्याचा समावेश या घरफोडी प्रकरणात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या रडारवर सध्या तो चोरटा आहे.
लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी येथील न्यायालयात त्याला पुन्हा हजर करण्यात आले होते.
कणकवली न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. ही घरफोडी २ जूनच्या पहाटे घडली होती, तर कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने एकत्रितपणे शोधमोहीम राबवत चोरटा लखन कुलकर्णी ऊर्फ सचिन माने याला शनिवारी गोकर्ण, कर्नाटक येथे अटक करून कणकवलीत आणले होते. त्याच्याकडून २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
त्यात चांदीच्या साखळ्यांचा समावेश आहे, तर सोन्याचे मंगळसूत्र व चेन दुसऱ्या चोरट्याकडे असल्याचे सचिन माने याने पोलिस तपासादरम्यान सांगितले आहे. या घरफोडीचा तपास कणकवली पोलिस करत आहेत.