शब्दांकन / सायली राजन सामंत, कुडाळ
चांदोमामा चांदोमामा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी…. खरं सांगू मित्रांनो या बडबड गीताच्या दोन ओळी वाचताना माझं हरवलेलं बालपण माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. कारण माझ्या बालपणी सोशल मीडियाच तेवढंस अस्तित्व नव्हतं. त्यामुळेचं माझ्या विचारधारेच्या माझ्या मित्रमंडळींनी आपल्या सर्वांच्या आवडीच्या या बडबड गीताच्या दोन ओळी अगदी आवडीने गुणगुणल्या असणार एवढं मात्र निश्चित. कारण माझं बालपण अशा अनेक बडबडगीतांनी अगदी आंनदमय करून टाकलेलं होत. हे अगदी खरं आहे.
आयुष्यातील हे सोनेरी दिवस कसे पलटून गेले ते माझे मलाच समजले नाहीत.आता फक्त या चांदोमामा चांदोमामा अशा असंख्य बडबड गीतांच्या रूपात उरल्या त्या फक्त आठवणी.माझ्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारा काळ म्हणजे माझं बालपण.मी बालपणी हवेत उडवत असणाऱ्या कापसाच्या म्हातारीने प्रत्येकाचे वय जरी नेले असले तरीही मन आणि जुन्या आठवणी काही मी उडवणाऱ्या त्या कापसाच्या म्हातारीला नेता आल्या नाहीत.हे वास्तव नाकारता येणार नाही. मला अगदी खात्री आहे की सोशल मीडियाचा प्रभाव माझ्यासारखा ज्या ज्या व्यक्तींच्या बालमनावर नव्हता त्या सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना त्या काळी हवेत उडवली जाणारी ती कापसाची म्हातारी आठवल्या शिवाय रहाणार नाही. कारण माझं बालपणच त्याकाळी मी हवेत उडवत असलेल्या त्या कापसाच्या म्हातारीने मॅजिकलं करून टाकलं होत.अगदी आनंदमय सुखद साक्षात्कार घडवणार ते माझं बालपणीच वास्तव होत.
अहो माझ्या बालपणी मला थोडी समज आल्या नंतर शालेय जीवनात असताना मी खोटा खोटा का असेना चक्क श्रीमंतीचा तोरा मिरवायचे,कारण पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझ्या मालकीची कागदाची का असेना 2,3 जहाजं चालायची,मोकळ्या हवेत कागदाची का असेनात मी स्वतःच्या मालकीची 2,3 विमानं उडवायची, मातीचा का असेना पण दिवाळी आली की माझ्या स्वतःच्या मालकीचा मी किल्ला बांधायचे. हे सत्य आणि सत्य आहे. माझ्या बालपणातील माझ्या विचारधारेच्या मुलांनी खोटा खोटा का असेनात तो श्रीमंतीचा काळ आजही हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवलेला आहे.कारण माझ्या लहानपणी माझ्या घरात मोबाईल नामक यंत्र तेवढेसे वापरात आलेले नव्हते.आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही तेवढंस मोबाईलचं व्यसनही नव्हतं. त्यामुळेचं माझ्या बालमनावर मोबाईल आणि सोशल मीडियाचा तेवढासा प्रभाव नव्हता. सध्याच्या घडीच्या मुलांकडे पाहिलं की माझ्या बालपणातील तो श्रीमंतीचा थाट मात्र हरववेला दिसतो. आणि नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतात. गेले ते मी अनुभवलेले माझ्या बालपणातील सुखकर दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी.
माझ्या बालपणी माझ्या घरात आजी आजोबांच्या रूपात संस्कार संपन्नतेच प्रतीक दर्शवणार विद्यापीठ उपलब्ध होत.त्यामुळेच प्रेम आपुलकी जिव्हाळ्याच बंधन निभावण्याची वृत्ती माझ्या स्वभावात आली.अगदीच प्रेमाच आणि आपुलकीच जवळच अस माझं नात सांगायचं झालं तर मला रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारा आणि कित्येकमैल दूर असणारा चांदोमामा माझा सख्खा मामा आहे असचं मला वाटायचं.म्हणूनच तर ज्या खिडकीतून चांदोमामा आणि तारे दिसायचे त्या खोलीत मी झोपायचा हट्ट करायचे आणि खिडकीतून मला चांदोमामा आणि तारे दिसले रे दिसले की ते तारे मोजता मोजता चक्क माझी तारांबळ उडायची, आणि चांदोमामाला पाहून नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडायचे चांदोमामा चांदोमामा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? आणि त्या गाण्याचा ठेका धरता धरता नकळत मला आजी आजोबांच्या मांडीवर कधी झोप लागायची ते माझं मलाच कळेनासं व्हायच.पण आताच्या घडीच्या मुलांच्या मनातील त्या चांदोमामा आणि ताऱ्यांची जागा घेतली आहे ती मात्र मोबाईल,नेटवर्क आणि सोशल मीडियाने.ही दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी लागेल.अहो एवढंच कशाला माझ्या लहानपणी आई शिस्तीला मारायची, बाबांच्या डोळ्यातील धाक आणि खाकरणं दिशादर्शक असायचं त्यामुळेच वडीलधाऱ्यांचा धाक घरात हुकूमत दर्शवायचा.अहो त्या धाकामुळेच तर माझ्यात संयमशिलता संचारली. आजच्या घडीला मी विचार मंथन करून मी माझ्या भल्याचा निर्णय घेऊ शकते . ही माझ्या आई वडिलांची आजी आजोबांचीच पुण्याई म्हणावी लागेल. ताटातलं जेवण संपण्यासाठी माझ्या आईनं रंजक पद्धतीने सांगितलेली गोष्ट ऐकता ऐकता माझ्या ताटातलं जेवण कधी संपून जायचं ना ते माझं मलाच कळेनास व्हायचं. तो आईच्या वात्सल्याचा अलौकिक साक्षात्कार असायचा.पण आताच्या प्रगतशील अशा विश्वाच्या सारिपाटावरील काळ पूर्णपणे बदलेलेला दिसतो.आता आईच्या रुचकर जेवणाची जागा पिझ्झा बर्गर आणि पास्ता अशा शरीराला घातक ठरणाऱ्या पदार्थांनी घेतली आहे,आणि माझ्या बालपणी माझी आई सांगत असलेल्या रंजक गोष्टीची जागा प्रत्येक घरातील टी. व्ही.वर सादर होणाऱ्या मालिकांनी तसेच मोबाईल आणि सोशल मीडियाने घेतलेली आहे.त्यामुळेच तर सध्याच्या मुलांना पांडव युगातील पराक्रमी भीमाच्या ऐवजी कार्टून मधील डोरेमॉन आणि छोटाभीम आपलासा वाटू लागलेला आहे. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
मला वयाच्या 6 व्या वर्षा पासून माहित होत की प्रभू रामचंद्र कोण? गोपाळ कृष्ण कोण?छत्रपती शिवाजी महाराज कोण? त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी काय केल होत?या सर्व वास्तवाची जाण मला माझ्या बालपणी माझ्या घरातच झाली.त्यामुळेच तर आज अगदी झोपेतून जरी मला उठवलं ना आणि मला विचारलं ना आपला धर्मग्रंथ कोणता आहे ? त्याचा थोडक्यात सरांश काय आहे?पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणजे काय,तो कोणी केला? रायरेश्वराच मंदिर कशाशी संबंधित आहे,? महारथी कर्णाची कवचकुंडल कोणी काढून घेतलेली होती ? छत्रपती संभाजी महाराजांबरोबर त्यांच्याच जवळच्या कुठल्या व्यक्तीने गद्दारी केली होती? आपल्या सिंधुदुर्ग किल्याचे आर्किटेक कोण होते? या सर्व प्रश्नांची उत्तर सटकन पटकन माझ्या डोळ्या समोर उभी रहातात. कधी झोप यावी म्हणून, तर कधी जेवणाचे चार घास पोटात जास्त जावेत म्हणून,तर कधी माझी लहान वयातील रडारड थांबावी म्हणून, लहानपणापासून या सर्व गोष्टी माझ्या कानावर पडत गेल्या आहेत. याच संपूर्ण श्रेय मी माझ्या आईबाबांना आणि आजीआजोबांना देते.म्हणून तर आज मी अभिमानाने सांगते की आमच्या घराच्या भिंतीना संस्कार संपन्नतेचा मुलामा होता,आमच्या घराला वडील धाऱ्यांच्या धाकाचे पिलर होते,आणि प्रेम आपुलकी जिव्हाळ्याच्या चौथुऱ्यावरती आमचे घर रुबाबात उभे होते.त्या घराला कार्यतत्परतेच प्रतीक दर्शवणारे छप्पर होते. आजही माझं घर तोच संस्कार संपन्नतेचा रुबाब मिरवताना दिसतं हा वास्तव नाकारून चालणार नाही. म्हणून तर माझ्या घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावरील भाव किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या!.. अशा शब्दांकनात मिरवताना मला पहायला मिळतो. सुदैवाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाच पांघरूण आणि मोबाईलच मायाजाल नसलेल्या घरात माझं बालपण मी जगले आहे हे मी माझं परम भाग्य समजते.
पण आजच्या प्रगतीपथावर असलेल्या नव्या आणि बदलत्या युगात हे सुखी आणि समृद्ध कुटुंबाचे चित्रच जणू पालटून गेलं आहे. आजच्या युगातील आईवडिलांना पॅकेजची दुनिया अधिक न्यारी वाटते.घर नावाच्या रंगमंच्यावरील संसाररुपी नाटकात आजीआजोबा कार्यक्षम असताना सुद्धा त्यांच्या वाट्याला भूमिकाच शिल्लक राहिलेली नाही.त्यामुळेच आजीआजोबांना वृद्धाश्रम नावाच्या रंगमंच्यावर मनाच्या विरुद्ध भूमिका साकारावी लागत आहे. ही आजच्या घडीची खरी शोकांतिका म्हणावी लागेल.एक बचपन का जमाना था जिसमे खुशियोंका खजाना था, चाहत चंदा मामा को पानेकी थी, दिल तो मेरा तारोंका दिवाना था, थककर मै स्कूलसे आया करती थी,फिर वापस मै दोस्तो के साथ खेलनेको जाया करती थी,रोनेकी वजह ना थी, ना हसने का बहाना था, प्रेम का झोका तो मेरेही घरमे मै मेरेही परिवार के साथ खेला करती थी…क्यो हो गयी मै इतनी बडी, इससे अच्छा तो मेरा बचपन का जमाना था……. हा वास्तव नाकारून चालणार नाही. आणि मी भविष्यात कितीही पैसा कमावला तरी मी माझं बालपण पुन्हा विकत घेऊ शकणार नाही.
असा अलौकिक आणि अविस्मरणीय काळ सध्याच्या घडीच्या मुलांच्या वाट्याला येईल का हो पुन्हा? अहो येईल का,अस का म्हणता? नक्कीच येणार. फक्त त्यासाठी पालकांनी सतर्क रहाणं गरजेचं आहे.
घरा घरात कौसल्येचा राम जन्माला यावा अस प्रत्येकाला वाटत पण त्याअगोदर घराघरात संस्कार संपन्न कौसल्या जन्माला आली पाहिजे,घरा घरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे अस प्रत्येकाला वाटतं पण त्याअगोदर घराघरात संस्कार संपन्न जिजाबाई जन्माला आली पाहिजे.त्याकरिता सध्याच्या घडीला पालकांनी आपलं काय चुकत त्याच सिहांवलोकन करावं. मग त्या पालक वर्गाला नेमक त्यांच कुठे चुकतंय हे त्यांच्याच निदर्शनास येईल.मग ते कार्यतत्पर बनतील. त्यानंतर योग्य त्या वयात मुलांना योग्यते मार्गदर्शन केल जाईल.मग पहा युवा पिढी दुराचाराकडे न जाता सदाचारी घडेल. त्यातून शिक्षण आणि संस्कार असा दुहेरी संगम साधला जाईल. मग पहा आपल्याला भविष्काळात युवापिढीतील आदर्श अशी नेतृत्व प्रत्येक क्षेत्रात उदयास आलेली पहायला मिळतील. तोच सर्व पालकवर्गासाठी साठी खरा गौरव ठरेल.