वीज वाहिनी अंगावर पडल्याने गाय जागीच ठार

सावंतवाडी तालुक्यातील घटना

सावंतवाडी : वीज वाहिनी अंगावर पडल्याने मळगाव-रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांची गाय जागीच ठार झाली. हा प्रकार आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. यात सातार्डेकर यांचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले. या घटनेनंतर वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सातार्डेकर हे संध्याकाळी तीन गाईंना नजीकच्या शेतात चरण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी गाईचा मालकाच्या डोळ्यादेखत तडफडून मृत्यू झाला. घटना घडताच प्रसंगवधान दाखवत श्री. सातार्डेकर यांनी त्वरित याची माहिती ग्रामस्थांना दिली. सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्या ठिकाणी बोलावून रीतसर पंचनामा करण्यात आला. ग्रामस्थांमधून वीज वितरणच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. वीज वितरणने जबाबदारी स्वीकारत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

error: Content is protected !!